नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काटोल मतदारसंघातील सतरंजी संघटनेत फूट पडली असून काँग्रेस नेते प्रकाश वसू यांनी संघटनेचा राजीनामा दिला आहे. आपण सतरंजी संघटनेत सहभागी असलो तरी काँग्रेसचे पदाधिकारी आहोत. असे असतानाही आपल्या फोटोचा वापर भाजप नेत्यांच्या स्वागतासाठी लावल्या जाणाऱ्या बॅनर पोस्टरमध्ये केला जात आहेत. यावर नाराजी व्यक्त करीत वसू यांनी राजीनामा दिला आहे.
भाजप नेते आ. डॉ. परिणय फुके यांचा नुकताच काटोल विधानसभेचा दौरा झाला. या दौऱ्यानिमत्त सतरंजी संघटनेतर्फे आ. फुके यांच्या स्वागताचे बॅनर, होर्डींग लावण्यात आले. त्यात प्रकाश वसू यांचाही फोटो होता. यावर वसू यांनी संघटनेच्या प्रमुखांना पत्र लिहून आक्षेप नोंदविला. सामान्य कार्यकर्त्यांच्या हितासाठी ‘सतरंजी’ही सामाजिक संघटना स्थापन करण्यात आली होती. मात्र, या संघटनेचा वापर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी होताना दिसत आहे. यापुढे संघटनेकडून आपल्या फोटोचा वापर होऊ नये व आपण संघटनेचा राजीनामा देत असल्याचे वसू यांनी स्पष्ट केले आहे.