- झाडीपट्टी रंगभूमीने घेतली फारकत : आंदोलनात दखल न घेतल्याने नाराजी
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्ट क्रांतिदिनी एकमुखाने पुकारण्यात आलेल्या ‘मी रंगकर्मी’ आंदोलनात झाडीपट्टीतील मागण्यांना कोणतेच स्थान देण्यात आले नसल्याच्या भावनेने या आंदोलनातून झाडीपट्टी रंगभूमीने फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊन भोगावे लागणारे सांस्कृतिक क्षेत्र आहे. या क्षेत्रावर निर्भर हजारो रंगकर्मी, गायक, नर्तक, लोककलावंत, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टिस्ट आदींचा समावेश होतो. त्याअनुषंगाने सांस्कृतिक क्षेत्राला मोकळीक देण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यभरातील हजारो कलावंत रस्त्यावर उतरले होते. आंदोलनाला काहीच दिवस उलटले असताना, यातील मनभेद आता उघडकीस यायला लागले आहेत. सांस्कृतिक मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात झाडीपट्टीच्या मागण्यांचा, तेथील स्थितीचा कोणताही उल्लेख केला नसल्याने, झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर झाडीपट्टीने ‘मी रंगकर्मी’ आंदोलनापासून फारकत घेत, स्वतंत्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत
झाडीपट्टी रंगभूमीची स्थिती अत्यंत वेगळी आहे. येथे सभागृहात किंवा बंद शामियान्यात नाटके होत नाहीत. अस्थायी लाकडी, कापडी किंवा मातीच्या ढिगाऱ्यावर रंगमंच उभारून नाटक केले जाते आणि एका मोसमात एका गावात एकच प्रयोग होतो. त्यामुळे, सध्या देण्यात आलेल्या कोरोना प्रोटोकॉलमध्ये झाडीपट्टीच्या नाटकांना परवानगी देण्यात यावी, ही मागणी होती. मात्र, त्याकडे मुंंबईच्या शिष्टमंडळाने दुर्लक्ष केले. आम्हाला साधी विचारणाही केली नाही. म्हणून आम्ही आमचे स्वतंत्र आंदोलन उभारत आहोत.
- मुकेश गेडाम, रंगकर्मी - झाडीपट्टी रंगभूमी
गैरसमज दूर करावा
झाडीपट्टीच्या मागण्या आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत निवेदनाद्वारे पोहोचवल्या आहेत. या संदर्भात झाडीपट्टीला गैरसमज झालेला असून, तो त्यांनी स्वत:च दूर करावा. हे आंदोलन सरसकट सर्व रंगकर्मींचे आहे. आंदोलनात कोणतीही फूट पडलेली नाही आणि पडूही देणार नाही.
- हरी पाटणकर, संयोजक - मी रंगकर्मी आंदोलन, मुंबई
सोमवारी राज्यभरात महाआरती
‘मी रंगकर्मी’ या शीर्षकांतर्गत हे आंदोलन राज्यभरात उभारले आहे. यात विशेष उल्लेख करण्याचे मुद्दाम टाळण्यात आले आहे. हे आंदोलन सरसकट सर्वांचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर १ सप्टेंबरच्या पूर्वी राज्य सरकारला रिमाईंडर म्हणून राज्यभरात एकाच वेळी महाआरती होणार आहे. नागपुरात सोमवारी संध्याकाळी ७ वाजता सुरेश भट सभागृहासमोर ही आरती केली जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू.
- चारूदत्त जिचकार, संयोजक - मी रंगकर्मी आंदोलन, नागपूर
....................