सावनेर : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती पर्वावर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याला साद देत शुक्रवारी सावनेर येथील रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. यात महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सावनेर येथील सुभाष मराठी प्राथमिक शाळेत ‘लोकमत’ व नगर परिषद, सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा रेखा मोवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. अरविंद लोधी होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे पदाधिकारी रामराव मोवाडे, शिक्षण सभापती तुषार उमाटे, प्रशासन अधिकारी दिनेश बुधे, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक बाबा टेकाडे उपस्थित होते. शिबिरात सर्वप्रथम नगराध्यक्ष रेखा मोवडे यांनी रक्तदान केले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकात सेवाभाव निर्माण करणारी असल्याचे प्रतिपादन मोवाडे यांनी केले. उपाध्यक्ष लोधी यांनी लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तसंकलनाचे कार्य आयुष रक्तपेढीच्या चमूच्यावतीने करण्यात आले. रक्तदात्यांना याप्रसंगी भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिबिराच्या आयोजनाप्रसंगी नगरसेवक सचिन उईके, स्वाती कामडी, विलास कामडी, सौरभ घटे, मोहन वानखेडे, सुजित बागडे, गजानन पटले, राजेंद्र सूर्यवंशी, रवींद्र ठाकूर, विजय लाड, नीरज बारापात्रे, कुणाल धपके, पिंटू सातपुते, तन्मय मोवाडे, अमित झोडापे आदी उपस्थित होते.