लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहेब, वाहतूक शाखेचे पोलीस चौकात उभे नाहीत. ते बाजूच्या झाडाखाली उभे आहेत. नमस्कार, येथे रस्त्यावर वाहन उभे आहे. मात्र, ट्रॅफिक पोलीस येथे दिसत नाही. वाहतुकीची कोंडी झाली आहे. येथे बॅरिकेटस आडवे तिडवे लावले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ट्रॅफिक पोलीस नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, या आणि अशाच स्वरूपाच्या तब्बल ३१ तक्रारी ट्रॅफिक कॉल सेंटरवर दोन दिवसात आलेल्या आहेत.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची चौकाचौकातील सिग्नलवर तैनाती केली जाते. मात्र, ते चौकाच्या बाजूला आडोशाला उभे राहतात. वाहनचालकाने नियम तोडावे आणि त्याच्याकडून वसुली करता यावी, असा आडोशाला राहणाºया पोलिसांचा हेतू असतो. सिग्नलवर पोलीस उभा दिसला तर कोणताही वाहनचालक नियम तोडण्याची हिंमत दाखवत नाही.मात्र, वाहतूक पोलीस सावज हेरण्याच्या उद्देशाने कर्तव्यात कसूर करीत असतात. त्यामुळे अपघात होतात अन् नाहक कुणाला जीवघेणी दुखापत होते. यासंबंधाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. रस्त्यावरील अपघाताला आळा बसावा आणि रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासंबंधाने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना २० मार्च २०१९ ला उच्च न्यायालयाने तैनातीच्या ठिकाणी गैरहजर राहणाºया किंवा कर्तव्यात कसूर करणाºया वाहतूक पोलिसाची नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यानुसार पोलीस नियंत्रण कक्षात वाहतूक शाखेच्या पोलिसांसंबंधीच्या तक्रारींसाठी २७ मार्चपासून नवीन कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी १७ तक्रारी आल्या तर आज गुरुवारी दुसºया दिवशी १४ तक्रारी आल्या.
चांगला प्रतिसाद : डीसीपी राजमाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, या नवीन उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी १७ तर आज दुसºया दिवशी १४ तक्रारी मिळाल्या. त्याची लगेच दखल घेण्यात आली आणि योग्य ती कारवाई करण्यात आली. या उपक्रमातून गुणात्मक बदलाची अपेक्षा उपराजधानीत एकूण १६१ वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यातील ८७ वाहतूक सिग्नल चौकात वर्दळीच्या वेळेत १५४ पोलीस कर्मचारी नेमले जातात तर, सर्वसाधारण वेळेत १११ कर्मचारी नेमले जातात. वाहतूक सुरळीत राहावी, कोणताही अडथळा अथवा अपघात होऊ नये आणि वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, असा त्यामागचा हेतू आहे. वाहतूक पोलिसांसंदर्भात नागरिकांनी कॉल सेंटरच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही उपायुक्त राजमाने यांनी केले.
तात्काळ पोलीस निरीक्षकांना संदेशनागरिकांनी तक्रार केल्यास पोलीस नियंत्रण कक्षातील ट्रॅफिक चॅनलवरून वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षकांना तात्काळ संदेश दिला देतात. संबंधित पोलीस निरीक्षक किंवा त्यांच्या अधिनस्थ अधिकारी तेथे जाऊन संबंधित तक्रारीची शहानिशा करतात आणि योग्य ती कारवाई केली जाते.