Anurag Thakur on India’s travel to Pakistan । नागपूर : आशिया चषक 2023च्या (Asia Cup 2023) आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वादंग सुरू आहे. अशातच आशिया चषक 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार की नाही याचा निर्णय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) सोपवला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतरच क्रीडा मंत्रालय आणि गृह मंत्रालय याबाबत निर्णय घेईल असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
खरं तर आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, बीसीसीआय सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले की, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. पण यानंतर तत्कालीन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.
चेंडू BCCI च्या कोर्टातनागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सर्वप्रथम आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाबाबत निर्णय घेऊ द्या, त्यानंतरच क्रीडा मंत्रालय आणि गृह मंत्रालय निर्णय घेईल." एकीकडे पाकिस्तान आशिया चषक आपल्या देशात आयोजित करण्यावर ठाम आहे, तर दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू सुरक्षेचे कारण देत शेजाऱ्यांवर निशाणा साधत आहे. अलीकडेच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा दाखला देत पाकिस्तानातील दहशतवाद आणि सुरक्षाव्यवस्था यावर टीका केली होती.
हरभजनने साधला निशाणा "टीम इंडियाने पाकिस्तानात जाऊ नये हे निश्चित. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी असे मला वाटते. मला माहित नाही की आमचा संघ तिथे किती सुरक्षित असेल. पाकिस्तानातील परिस्थिती देखील सुरक्षेच्या कारणास्तव चांगली नाही. त्यांना यायचे असेल तर येऊद्या नसेल यायचे तर काही फरक पडत नाही. पाकिस्तानशिवाय भारतीय क्रिकेट चालू शकते. पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज भासू शकते. पण भारताला पाकिस्तानची गरज नाही", अशा शब्दांत हरभजनने पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"