लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या लाटेत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतरही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. पोलीस प्रशासनाने एका महिन्यात अशा विनाकारण फिरणाऱ्या ९,३३३ लोकांची ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली आहे. तर २३३ पॉझिटिव्ह नागरिकांची १४ दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी राज्य शासनाने ३१ मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे वारंवार सांगितले आहे. पॉझिटिव्ह असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या 'सुपर स्प्रेडर'मुळे कोरोना जीवघेण्या अवस्थेत जिल्ह्यांमध्ये वाढला आहे. मात्र तरीही नागरिक बाहेर पडत असून त्यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे.
पोलिस विभागामार्फत १७ एप्रिल ते १८ मे या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ९३३३ लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ब्रेक द चेन नियमावली अंतर्गत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्या लोकांची ऑन द स्पॉट अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये २३३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तिसरी लाट पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे, लसीकरणासाठी आग्रही असावे, नागरिकांनी वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर व मास्क या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.