भिवापूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी संभावित तिसरी लाट चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी तहसील कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सुपर स्प्रेडर ठरणारे व्यावसायिक व दुकानदारांची 'ऑन दी स्पॉट' कोविड तपासणी केल्या जात आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी तब्बल ७५ दुकानदारांची तपासणी करण्यात आली असून या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
उमरेड शहरात दुकानदारांची कोविड तपासणी करताना एकाच दुकानात काम करणारे आठ जण कोविड पॉझिटिव्ह आढळले. याची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी प्रारंभी शहरात शुक्रवारपासून सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या दुकानदारांची 'ऑन दी स्पॉट' कोविड तपासणी सुरू केली आहे. अँन्टिजन तपासणी असल्यामुळे अवघ्या पाच मिनिटात रिपोर्ट प्राप्त होत आहे. पहिल्याच दिवशी ७५ दुकानदारांची तपासणी करण्यात आली. यात सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या मोहिमेत डॉ. कल्याणी बारसागडे, आशा सेविका हेमलता दिघोरे, परिचारिका मीनल चिकटे, अशरफ पठाण, संजय मेश्राम, भगवान वाघमारे, पोलीस कर्मचारी निकेश आरीकर यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे विनामास्क फिरणाऱ्यांची कोविड तपासणी करण्यात येत असून मास्क न वापरल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. आज अशा चार जणांवर दंडात्मक कारवाई करत चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत पोलीस विभाग, नगरपंचायत व आरोग्य विभागाचेही सहाकार्य लाभत आहे.
----
'सुपर स्प्रेडर' मोहिमेंतर्गत शहरातील सर्वच लहान मोठ्या दुकानदारांची दर १५ दिवसानी ऑन दि स्पॉट कोविड ॲन्टीजन तपासणी होणार आहे. यात विनामास्क फिरणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी या मोहिमेला प्रत्येकानी सहकार्य करावे. शिवाय आवश्यक ती काळजी घ्यावी.
- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार भिवापूर
090721\img-20210709-wa0107.jpg
रस्त्याने आवागमन करणा-या वृध्देची 'ऑन दी स्पॉट' कोविड तपासणी करतांना पथक