लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरातील संवेदनशील वस्त्या तसेच झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला असून, शनिवारी रात्रीपासून विविध भागांत कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांची धरपकड केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी दिली. होळी आणि धुळवडीच्या दिवशी ठिकठिकाणची गुन्हेगारी वळवळते. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे गुन्हे होतात. शहरात यावेळी असे काही घडू नये, यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही त्यांच्या परिसरात कुठे, कसलीही गडबड किंवा संशयास्पद हालचाल दिसली तर तातडीने नियंत्रण कक्षात माहिती द्यावी. पोलीस तातडीने तेथे पोहोचून संभाव्य गुन्हा टाळण्याचा प्रयत्न करतील, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आधीपासूनच कामी लागले आहेत. धुळवडीच्या दिवशी दारूच्या नशेत काहीजण हुल्लडबाजी करतात. त्यांचाही बंदोबस्त केला जाणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी-कर्मचारी आणि वाहतूक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली आहे. शहरात ७५ फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत; तर ६६ ठिकाणी नाकेबंदी केली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथके गस्त करणार आहेत. दुचाकीवर एक आणि चारचाकी वाहनात दोनच व्यक्ती फिरण्यास मुभा आहे.
----
परिवार एकत्र येऊन रंग खेळण्यावरही बंदी
वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होळी आणि धुळवडीचा सण घरीच साजरा करावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना कारवाई करावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायटीतील विविध परिवार एकत्र येऊन रंग खेळण्यावर बंदी आहे. असा कुणी प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
---