लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगामुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. निवडणूक आयोग आपल्या जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाही, हा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. बंगालमधून केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना हटविण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
उत्तर कोलकातामध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या. मद्रास उच्च न्यायालयाने कोरोनादरम्यान विधानसभा निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. त्यावर ममता यांनी भाष्य केले. कोरोनाप्रभावित राज्यांमधून आणण्यात आलेले दोन लाख केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना वापस पाठविले पाहिजे. ते शाळा, महाविद्यालयात थांबले असून त्यांच्यामुळे कोरोना नियोजनाला फटका बसला आहे. त्यांच्यातील ७५ टक्के जवान बाधित आहेत. अंतिम टप्प्यातून त्यांना हटविण्यात आले, असे प्रतिपादन ममता यांनी केले.
कोरोनावरून ममता जनतेला संभ्रमित करत आहेत - नड्डा
कोरोना लसीकरण, बाहेरून आलेले लोक इत्यादी मुद्यांवरून ममता बॅनर्जी बंगालच्या जनतेला संभ्रमित करीत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लावला आहे. लसीकरणावरून ममता खोटे आरोप लावत असून, दुसरीकडे पंतप्रधानांच्या बैठकीला जात नाहीत. त्या स्वतः बंगालच्या आरोग्यमंत्री आहेत. मात्र त्याच लसीकरणावरून जनतेमध्ये खोट्या बाबींचा प्रसार करीत आहेत, असे नड्डा म्हणाले.
भाजप उमेदवार कोरोनाबाधित
उत्तर २४ परगणा येथील बडानगरमधील भाजपच्या उमेदवार परनो मित्रा कोरोनाबाधित झाल्या आहेत. आतापर्यंत भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माकपचे उमेदवार सुजान चक्रवर्ती, तृणमूलचे उमेदवार मदन मित्रा यांच्यासाठी अनेक उमेदवार व पदाधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. तीन उमेदवारांचा तर कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला.