नागपूर : बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अडचणीचा जाणारा इंग्रजीचा पेपर गुरुवारी आटोपला. नागपूर विभागात केवळ पाच कॉपीच्या प्रकरणाची नोंद झाली आहे. कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्डाने ४७ पथके तयार केली होती. विद्यार्थ्यांना अडचणीच्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये केवळ पाच कॉपी सापडणे याचा अर्थ खरच प्रामाणिक झाले, किंवा बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाला मिळालेले हे यश म्हणावे की नियुक्त केलेल्या पथकांचे अपयश, हे कळायला मार्ग नाही. मात्र या पथकांवर ४ लाख ७० हजार रुपयांचा खर्च झाला हे नक्कीच.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा सुरक्षित आणि सुरळीत पडाव्यात म्हणून नागपूर विभागीय मंडळाने जय्यत तयारी केली होती. विभागात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी ४७ पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी माध्यमिक, शिक्षण अधिकारी निरंतर शिक्षण, विशेष महिला भरारी पथक, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक, उपसंचालक कार्यालय, सहायक संचालक, व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दक्षता पथक, या व्यतिरिक्त बोर्डाचे स्वतंत्र पाच पथक तैनात करण्यात आले होते. प्रत्येक पथकामागे बोर्ड १० हजार रुपये देते. ही पथके परीक्षा केंद्रावर जाऊन भेट देतात. कॉपीसदृश्य स्थिती आढळल्यास कारवाई करतात. बोर्डाने विभागातील काही संवेदनशील केंद्रही घोषित केले आहे. साधारणत: कॉपी हा प्रकार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो. (प्रतिनिधी)
पथके ४७ आणि कॉपी सापडल्या फक्त ५
By admin | Published: February 19, 2016 3:04 AM