आरपीएफचे पाऊल : रेल्वेगाड्यांची होतेय कसून तपासणी
नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा लहान मुलांचे अपहरण होते. तसेच चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पथक तयार केले असून हे पथक रेल्वेगाड्यात होणाऱ्या अवैध बाबींना आळा घालण्याचे काम करीत आहे.
रेल्वेत लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असून सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ४५ जोडी रेल्वेगाड्या धावत आहेत. रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असताना गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने एका पथकाची नेमणुक केली आहे. हे पथक अपहरण केलेल्या बालकांवर लक्ष ठेवण्याचे काम करीत आहे. रेल्वे मार्गाने दारूची तस्करी करण्यात येते. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात या दोन्ही जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यात येते. त्यावरही रेल्वे सुरक्षा दलाने नेमणुक केलेले पथक लक्ष ठेवून आहे. रेल्वेगाड्यात अनेकदा आरोपी दारूच्या बॉटल्स पोती किंवा बॅगमध्ये ठेवून बाजूला बसतात. अखेरचा थांबा येईपर्यंत ते या दारूच्या बॅगवर आपला हक्क सांगत नाहीत. अशा वेळी आरपीएफचे जवान या बेवारस बॅग ताब्यात घेतात. प्रवासात पकडल्या गेल्यास हे आरोपी या बॅगवर आपला हक्क सांगत नाहीत. पकडल्या न गेल्यास अखेरच्या थांब्यावर ते ही बॅग खाली उतरवून घेतात. आरपीएफने गठित केलेल्या पथकात एक अधिकारी आणि सहा जवानांचा समावेश आहे. आरपीएफच्या पथकामुळे रेल्वेस्थानकावर बालकांचे अपहरण आणि दारूच्या तस्करीवर आळा बसणार असल्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
..................
आरपीएफचे पथक सज्ज
‘रेल्वे मार्गाने अनेकदा बालकांचे अपहरण करण्यात येते. तसेच दारूच्या तस्करीसाठीही रेल्वेचा वापर करण्यात येतो. यावर आळा घालण्यासाठी आरपीएफतर्फे पथकाची नेमणूक करण्यात आली असून यानंतर अशा घटनांवर अंकुश लागणार आहे.’
-आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल
...............