लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील गावागावात साेबतच शेतशिवारात विद्युत जाळे पसरले आहे. परंतु वर्दळीच्या मार्गावरील विद्युत तारांवर वेलीचा विळखा दिसून येत असल्याने एखाद्यावेळी अपघाताची शक्यता बळावली आहे. काचूरवाही गावाबाहेरील जयस्वाल विद्यालयासमाेर असलेल्या विद्युत खांबावर जुने बाभळीचे झाड धाेकादायक ठरत आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या गंभीर बाबीकडे महावितरणचे दुर्लक्षच हाेत आहे.
काचूरवाही गावाबाहेर असलेल्या जयस्वाल विद्यालयासमाेर ऐन वीजखांबावर जुने वाळलेले बाभळीचे झाड असून, झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर गेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. याच मार्गाने काचूरवाही येथील स्व. ॲड. नंदकिशाेर जयस्वाल विद्यालय व समर्थ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ये-जा करतात. शिवाय रामटेकला जाण्याकरिता स्थानिक नागरिकदेखील याच मार्गाचा वापर करतात. धाेकादायक ठरत असलेल्या विद्युत तारांकडे महावितरण व काचूरवाही येथील संबंधित लाइनमनचे दुर्लक्ष हाेत आहे. शाळेसमाेरील वीजखांबावर आलेल्या झाडाच्या फांद्यांची कटाई करण्याची मागणी शाळेचे प्राचार्य सुनील काेल्हे यांच्यासह काचूरवाही येथील नागरिकांनी केली आहे.