आॅनलाईन लोकमतनागपूर : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नामुळे धार्मिक संघटना व आखाड्यांचे राजकारण तापले आहे. रविशंकर यांच्या प्रयत्नांवर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी या मुद्यावर चर्चा करणार आहेत. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले श्री श्री रविशंकर शनिवारी सरसंघचालकांची भेट घेणार आहेत.सद्यस्थितीत रामजन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून सौहार्दपूर्ण पद्धतीने तोडगा निघावा यासाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी व धर्मगुरूंशी भेट घेऊन चर्चा केली. मात्र रविशंकर यांनी मध्यस्थीच्या दाखवलेल्या तयारीला आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि विश्व हिंदू परिषदेनेही विरोध केलेला आहे. असवुद्दीन ओवैसी, आजम खान यासारख्या मुस्लिम नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. इतकेच काय तर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या प्रयत्नांना विरोध झाला. भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती यांनी रविशंकर यांच्यावर मोठा प्रश्नच उपस्थित केला. रविशंकर यांनी गोळा केलेल्या अमाप संपत्तीची चौकशी होऊ नये यासाठीच त्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप वेदांती यांनी केला. या वादात मध्यस्थी करणारे रविशंकर कोण आहेत, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर रविशंकर यांनी शुक्रवारी लखनौ येथे ‘आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते थेट नागपूरला आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले आहे. या भेटीमध्ये राममंदिर मुद्याचा तोडगा निघावा यासाठी नेमकी काय पावले उचलली पाहिजे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.मी सकारात्मक : श्री श्री रविशंकरदरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री श्री रविशंकर अयोध्या राममंदिर मुद्याबाबत मी सकारात्मक असल्याचे सांगितले. रामजन्मभूमी वाद हा चर्चेतून सोडविल्या जाऊ शकतो. याचा तोडगा निघेल असा मला विश्वास आहे. हा वाद लवकरात लवकर दूर व्हावा, अशी माझी इच्छा असून मी सकारात्मक पद्धतीनेच याकडे पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.श्री श्री रविशंकर पडले एकटे ?राममंदिराबाबत हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दोन गट दिसून येत आहेत. एका गटाला संघर्षपूर्ण पद्धतीने राममंदिर निर्माण हवे असून यामुळे वातावरण तापून हिंदू एकजूट होतील, अशी त्यांची धारणा आहे. तर कुठल्याही वादाशिवाय सामोपचाराने तोडगा निघावा असा मानणारा दुसरा गट आहे. मात्र या दुसºया गटातून रविशंकर यांच्या समर्थनार्थ फारसे कुणी समोर आले नाही. याउलट श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांबाबत विरोधाचेच जास्त वातावरण दिसून येत आहे. त्यांच्या भूमिकेवरदेखील अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांना होणारा विरोध लक्षात घेता ते एकटे पडले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संघभूमीत श्री श्री रविशंकर घेणार सरसंघचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 8:06 PM
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नामुळे धार्मिक संघटना व आखाड्यांचे राजकारण तापले आहे.
ठळक मुद्देरामजन्मभूमी वादावर करणार चर्चा : मध्यस्थीला हिंदुत्ववादीसंघटनांकडूनदेखील झाला विरोध