आॅनलाईन लोकमतनागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी यासंदर्भात मंगळवारी घोषणा केली. आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ते विद्यापीठाचे कुलगुरू झाले आहेत.डॉ. उमा वैद्य यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांच्याकडे संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. वरखेडी यांच्या नावाची घोषणा केली.डॉ. वरखेडी सध्या बंगळुरू येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठामध्ये प्राध्यापक तसेच अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी बंगलोर विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. ही पदवी प्राप्त केली असून, दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थान येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्राधिकरणांचे सदस्य आहेत. संस्कृतच्या ‘ई-रिपॉरिटॉरी’बाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. याशिवाय शास्त्रातील संशोधन पद्धतीवरदेखील त्यांचा अभ्यास आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांत त्यांचे ३० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, शिवाय त्यांनी विविध पुस्तकांचेदेखील लेखन केले आहे.