लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर येथे बहिणीकडे राहत असलेल्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका एसआरपीएफ जवानाची निर्दोष सुटका केली. विनोद भगवान घेवंदे (२६) असे आरोपीचे नाव असून, तो हिंगणा मार्गावरील इसासनी येथील रहिवासी आहे. वैशाली घवराड, असे मृत तरुणीचे नाव होते. ती नागपूर जिल्ह्यातील भारशिंगी येथील रहिवासी होती. विनोदने वैशालीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. आधी लग्नास होकार देऊन नंतर लग्न करण्यास नकार दिला होता. वैशालीच्या घरच्यांनी लग्नपत्रिकाही छापल्या होत्या. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन तिने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. २७ डिसेंबर २०१४ रोजी तिचा तलावात मृतदेह आढळून आला होता. मृत तरुणीची बहीण अनिता राहुल इंगळे हिच्या तक्रारीवरून विनोदविरुद्ध भादंविच्या ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन न्यायालयाने आरोपी विनोद घेवंदे याची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.
एसआरपीएफ जवानाची निर्दोष सुटका
By admin | Published: May 20, 2017 2:54 AM