आॅनलाईन लोकमतनागपूर : आज पुरुषांच्या तुलनेत महिला फार मागे आहे. देशाच्या खेड्यापाड्यात महिलांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांचा आवाजाच दाबला गेला आहे. चूल आणि मूल हीच संस्कृती आजही खेड्यांमध्ये बघायला मिळते. देशातील ग्रामीण भागात लैंगिक समानतेची गरज असल्याचे सृष्टी बक्षी म्हणाल्या. सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले.देशभरात महिला सुरक्षेचा असलेला प्रश्न, ‘आय एम चेंज मेकर’, आपल्या हक्काची जाणीव, आर्थिक व संगणक साक्षरता, स्वच्छता, सॅनिटेशन, नेतृत्वक्षमता याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘क्रॉसबो माईल्स’ मोहिमेच्या माध्यमातून सृष्टी बक्षी यांनी पदयात्रा सुरू केली आहे. २६० दिवसात त्या ३८०० किमी पायी प्रवास करून एप्रिलपर्यंत श्रीनगरमध्ये दाखल होणार आहे. या दरम्यान ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात येत असून महिलांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, यासाठी मार्गदर्शन देण्यात येत आहे. देशाला महिलांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित बनविण्याच्या वाटचालीसाठी जागृतीचे दमदार पाऊल टाकणार, असा निर्धार सृष्टी बक्षीने पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला. १७००० लोकांशी साधला संवादसृष्टीने आपल्या मोहिमेद्वारे मागील १०३ दिवसात १७ हजार लोकांशी संवाद साधला. यात विद्यार्थी, शिक्षक, जिल्हाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य पोलिसांचा समावेश आहे. महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण या दृष्टीने महिला व मुलींसाठी मोहीम फायदेशीर ठरल्याचा विश्वास व्यक्त केला. या दरम्यान अनेक शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. सर्वत्र महिलांच्या सारख्या समस्या१५ सप्टेंबर २०१७ रोजी कन्याकुमारी येथून पदयात्रेला सुरुवात झाल्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा होत महाराष्ट्रात दाखल झाल्या. या दरम्यान सर्व ठिकाणी महिलांच्या समस्या काही प्रमाणात सारख्या आढळून आल्यात. त्यात म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव, स्वत:च्या क्षमतेविषयी असणाऱ्या जाणिवेची कमतरता, मुलींसाठी शिक्षणाच्या संधीचा अभाव, हुंडाबळी, दारू आणि कौटुंबिक हिंसाचार आदी समस्या असून त्यावरील उपाययोजनांचा शोध घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या समस्या मांडणार सरकारकडेसृष्टीच्या या अभियानाला गुगल व टाटा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. कार्यशाळेत महिलांनी मांडलेल्या व्यथा, अनुभव त्या आपल्या वेबसाईटवर टाकणार आहे. आलेल्या अनुभवांचा एक सखोल अहवाल तयार करून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते, यासाठी सरकारला अहवाल सादर करणार आहे.