नागपूर : नागपूर येथून धुळे येथे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या हिरकणी बसने कोंढाळी बसस्थानकावर गुरुवारी सकाळी अचानक पेट घेतला. एसटी चालक व बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रकाच्या शर्थीच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुरातील गणेशपेठ आगारातून नागपूर - धुळे हिरकणी बस (क्र. एमएच १४ बीटी ५०३४) १६ प्रवाशांना घेऊन सकाळी ६.२० वाजता अमरावतीमार्गे धुळे येथे जाण्यासाठी निघाली. ही बस कोंढाळी बसस्थानकावर सकाळी ७.३० वाजता पोहोचली. येथे काही वेळ थांबा घेतल्यानंतर बसचालक लक्ष्मीकांत तायडे यांनी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र बस सुरू न होताच इंजिनमधून धूर निघण्यास सुरुवात झाली. यानंतर तातडीने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.
काही काळातच बसच्या कॅबिनमध्ये आग लागली. बसचालक लक्ष्मीकांत तायडे व वाहक मेश्राम यांनी बसमधून बाहेर पडत आग विझविण्यास सुरुवात केली. लागलीच स्थानकावर असलेले वाहतूक नियंत्रक इमरान पठाण यांनी बसमधील अग्निशमन यंत्र बाहेर काढून आग विझविण्यास सुरुवात केली. या तिघांच्या प्रयत्नानंतर काही वेळात आग आटोक्यात आली. या घटनेची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर काटोल आगाराचे व्यवस्थापक अनंत तराट यांनी कोंढाळी येथे दाखल होत हा घटनेची माहिती घेतली.
- तरीही जाग येईना
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कोंढाळीमार्गे एसटीच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे आदी अनेक लांब पल्ल्याच्या बसेस धावतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बसेसची दुरुस्ती व देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्याने प्रवाशांना याचा फटका बसतो आहे. ४ एप्रिल २०२३ रोजी नागपूर-अमरावती मार्गावर चमेली शिवारात धावत्या शिवशाही बसला आग लागली होती. या घटनेत सुदैवाने बसमधील १६ प्रवासी बचावले. मात्र ही बस पूर्णपणे जळून खाक झाली होती