लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यासाठी एसटी बस सज्ज आहे. गुरुवारी १५ डिसेंबरपासून एसटीची विशेष प्रवासी बस ‘समृद्धी’मार्गे रोज नागपूरहून शिर्डीला जाणार आहे.
रविवारी या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानंतर या मार्गाचा वापरही सुरू झाला. खासगी प्रवासी बसच्या संचालकांना तर या महामार्गामुळे वेगळाच आनंद झाला आहे. कारण जेथे ७ ते ९ तास लागायचे ते नागपूर-शिर्डी अंतर केवळ ५ तासांत पूर्ण होणार आहे. त्यांचे तीन तासांचे डिझेल अन् त्यापोटी होणारा हजारोंचा खर्च आता कमी होईल, अर्थात हा खर्च नफा म्हणून ट्रॅव्हल्स संचालकांच्या खिशात जमा होणार आहे. वेळ वाचणार म्हणून प्रवासीही ट्रॅव्हल्सकडे धाव घेणार आहे. हा एकूणच सगळा जमा खर्च अन् लाभ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानेही आपली बससेवा या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशपेठ बसस्थानकावरून रोज रात्री ९ वाजता ही बस निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ती शिर्डीत दाखल होईल. अशाच प्रकारे दररोज रात्री ९ वाजता शिर्डीतून एक बस निघेल आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
येथेही सवलत मिळेलबसचे प्रवासभाडे १३०० रुपये आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशाला मोफत प्रवासाची सवलत मिळेल, तर ६५पेक्षा जास्त वय असलेल्यांना अर्धेच तिकिट लागेल.
आरामदायक प्रवास एसटीची ही बस आरामदायक, स्लिपरकोच असणार आहे. अर्थात जेवण करून रात्री बसमध्ये बसले की छान झोप घेऊन प्रवाशांना भल्या सकाळी शिर्डीत पोहोचता येईल.