लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खबरदारी म्हणून एसटी प्रशासन प्रत्येक बस स्वच्छ धुवून निर्जुंतुकीकरण केल्यावरच प्रवासासाठी उपलब्ध करून देत आहे. परंतु गणेशपेठ बसस्थानकावर स्वच्छतागृहाजवळ दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे.नागपूर विभागात आठ डेपो आहेत. मुख्य गणेशपेठ बसस्थानकासह इमामवाडा, घाटरोड, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, रामटेक आणि सावनेर या आगारांचा समावेश आहे. विभागात एकूण ५७० बसेस असून ११०० चालक तर ९३० वाहक आहेत. कोरोनाची भीती असली तरी प्रवाशांची संख्या कमी झाली नाही. एसटीच्या बसेस प्रवाशांनी खचाखच भरून आगाराबाहेर निघत आहेत. वाहकाचा संपर्क सतत प्रवाशांसोबत येतो, परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना मास्क देण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे मागील १५ दिवसापासून येथील सफाई कर्मचारी संपावर आहेत. वेतनावरून त्यांनी संप पुकारला आहे. सफाई कर्मचारी नसल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शनिवारी पार्सल कार्यालयाजवळील स्वच्छतागृहाजवळ भयंकर दुर्गंधी येत होती. प्लॅटफार्मच्या शेजारील स्वच्छतागृहाचीही हीच अवस्था होती तर पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीही अस्वच्छता आढळली.प्रत्येक बसच्या स्वच्छतेला प्राधान्य‘एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार प्रत्येक बसची स्वच्छता करण्यात येत आहे. बसेस आतूनही निर्जंतुक करण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यात येईल. सफाई कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बसस्थानकावर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय बसस्थानकावर उद्घोषणा करून प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.’नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर
नागपुरात एसटी बसेस स्वच्छ करूनच प्रवाशांसाठी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:27 AM
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खबरदारी म्हणून एसटी प्रशासन प्रत्येक बस स्वच्छ धुवून निर्जुंतुकीकरण केल्यावरच प्रवासासाठी उपलब्ध करून देत आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : बसस्थानकावर दुर्गंधीचे साम्राज्य