नागपूर : मंगळवारी एसटी महामंडळाच्या काही आगारात डिझेलचा तुटवडा झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. नागपुरात गणेशपेठला येणाऱ्या बहुतांश बसचालकांना घाट रोड येथून डिझेल भरावे लागले. तर विदर्भात यवतमाळ आणि पुसद येथेही डिझेलचा तुटवडा भासल्यामुळे काही फेऱ्यांवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनानंतर एसटी महामंडळाच्या बसेसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. परंतु डिझेल १२ हजार लिटर, २० हजार लिटर अशा क्षमतेने मिळत असल्यामुळे गरज असलेल्या आगारात डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. त्यानुसार सध्या सावनेर, रामटेक येथील आगारात डिझेल उपलब्ध नाही. येथील बसेस नागपूरला येत असल्यामुळे या बसेसमध्ये नागपुरातील गणेशपेठ, घाटरोड डेपोतील स्टोअर युनिटमधून डिझेल भरण्यात येते. परंतु गणेशपेठ आगारात मंगळवारी काही पैसे कमी पडल्यामुळे डिझेलचा टँकर बुक होऊ शकला नाही. त्यामुळे गणेशपेठ आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या बसचालकांना घाटरोड डेपोतून डिझेल भरण्याची पाळी आली. तर विदर्भात यवतमाळ आणि पुसद येथील आगारात डिझेलचा तुटवडा पडल्यामुळे तेथील फेऱ्यांवर परिणाम झाल्याची माहिती आहे.
...............
उत्पन्नावर परिणाम नाही
‘गणेशपेठ आगारात डिझेलचे टँकर येऊ न शकल्यामुळे आगारातील बसेस तसेच सावनेर, रामटेक येथील बसेसमध्ये घाटरोड डेपोतून डिझेल भरण्यात आले. परंतु नागपूर विभागात यामुळे कोणत्याही फेऱ्या रद्द झाल्या नाहीत आणि उत्पन्नावर परिणाम झाला नाही. मंगळवारी नागपूर विभागाचे उत्पन्न नेहमीप्रमाणे ३८ लाख झाले. केवळ सायंकाळच्या सुमारास ग्रामीण भागात जाणाऱ्या काही बसेसला विलंब झाला.’
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
............