नागपूर : एसटी महामंडळाने ५०० लालपरी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसच्या देखभालीसाठी जागेची व्यवस्था करण्याबाबतचे पत्र विभागीय कार्यालयांना पाठविले आहे. परंतु आधीच शिवशाही बसेसमुळे एसटीचे नुकसान झालेले असताना पुन्हा लालपरी भाडेतत्त्वावर घेणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करून एसटी कामगार संघटनेने महामंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
एसटी महामंडळाने ५०० लालपरी खासगी वाहतूकदारांकडून भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगी बसेसच्या दुरुस्तीसाठी आगारात वेगळी जागा निश्चित करण्याबाबत विभागीय कार्यालयांना पत्र पाठविले आहे. तसेच ३०० ते ४०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या मार्गाची माहितीसुद्धा मागविली आहे. या खासगी गाड्यांची पार्किंग व मेन्टेनन्ससाठी महामंडळाच्या मालकीची जागा देणे तसेच जास्त उत्पन्न आणणारे महामंडळाचे मार्गही खासगी वाहतूकदारांना देण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. यास एसटी कामगार संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. आधीच भाडेतत्त्वावरील शिवशाही बसेस सुरू केल्यामुळे महामंडळाचे अतोनात नुकसान झालेले असताना लालपरी भाडेतत्त्वावर घेणे चुकीचे असल्याचे संघटनेने महामंडळाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर, पुणे आणि दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बसबांधणी करता येते. महामंडळाने योग्य नियोजन करून आपल्याच कार्यशाळेत बसबांधणी करून भाडेतत्त्वावर बस घेण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. भाडेतत्त्वावर लालपरी घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
...........
लालपरी भाडेतत्त्वावर घेण्यास महामंडळाचे नुकसान
‘खासगी भाडेतत्त्वावरील शिवशाही बसेस चालवून महामंडळाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे खासगी भाडेतत्त्वावरील लालपरी चालविण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा. महामंडळाने हा निर्णय मागे न घेतल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’
- अजय हटटेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
...........