नागपूर : आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिकण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नागपुरात येतात. अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी एसटीच्या बसेस सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे.
ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी नागपुरात शिकण्यासाठी येतात. परंतु अनेक मार्गावर एसटीच्या बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. एसटीचा पास काढून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. परंतु त्यांच्या मार्गावर बस नसल्यामुळे त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परंतु एखाद्या मार्गावर २० विद्यार्थी मिळाल्यास आणि संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी मागणी केल्यास एसटीच्या बसेस सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही भर पडणार असून विद्यार्थ्यांनाही सुविधा मिळणार आहे. मागणी केल्यानंतर त्वरित या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या एसटीची ७० टक्के वाहतूक सुरू आहे. एसटीच्या ३० टक्के बसेस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळाल्यास या बसेसही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.
.............