लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी कोलमडली. मात्र, उत्पन्नाचे नवे मार्ग शोधून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने गेल्या साडेसात महिन्यांत ३२ लाखांचे अतिरिक्त उत्पन्न कमावले. एसटी ट्रकच्या माध्यमातून मालवाहतूक, टायर रिमोल्डिंग अशा यशस्वी प्रयोगानंतर आता विदर्भात पर्यटन बससेवेचा नवा प्रयोगही सुरू केला आहे.
कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महामंडळाच्या नागपूर विभागाने २ जूनपासून मालवाहतूक सेवेला प्रारंभ केला. विभागाकडे सध्या २१ ट्रक असून, रोज ८ ते ९ ट्रक मालवाहतुकीची सेवा देतात. यातून आतापर्यंत ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. व्यापारी, उत्पादक, कारखानदार यांच्याशी संपर्क साधून त्यांचा माल मार्गावरील गावात पोहोचवून दिला जात आहे. प्रशासनाने नागपूरहून तिरुपतीला ईव्हीएम मशिन्स पोहोचविण्याचे काम दिले होते. या एका कामातूनच ११ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला झाले.
रिमोल्डिंगचे कामही येथे जून महिन्यापासून हाती घेण्यात आले आहे. यातून आतापर्यंत ७० टायर रिमोल्ड करून दिले असून, या माध्यमातून १ लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या बसचे टायर रिमोल्ड करून देण्यासाठी महामंडळाचा पत्रव्यवहार सुरू आहे. आपली बससेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू नाही. मात्र, लवकरच ती सुरू झाल्यावर हे कंत्राट मिळेल, याची महामंडळाला खात्री आहे.
...
पहिली पर्यटन बससेवा सुरू
नागपूर विभागाने १० जानेवारीपासून पर्यटन बससेवेचा प्रयोग सुरू केला. नागपूर ते सुराबर्डी, शिवटेकडी, आदासा, धापेवाडा, रामटेक गड, खिंडसी, ड्रगन पॅलेस आणि परत, असा हा २१० किलोमीटरचा प्रवास आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ७, असा ११ तासांच्या प्रवासासाठी २५० रुपयांचे भाडे आकारले जाते. ज्येष्ठ नागिरक व मुलांना नियमानुसार सवलत दिली जात आहे. प्रत्येक रविवारी ही सेवा राहणार आहे. डिझेलचा ४,२०० रुपयांचा खर्च वजा जाता प्रत्येक फेरीतून ११ हजार रुपयांचे उत्पन्न मिळात आहे. पुढच्या आठवड्यात नागपूर ते ताडोबा अशी दुसरी पर्यटन बस सुरू करण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यासाठी सर्व्हेही झाला आहे.
...
सध्या ८५ टक्के क्षमतेने सेवा
नागपूर विभागात महामंडळाची सेवा सध्या ८५ टक्के क्षमतेने सुरू आहे. ४५० पैकी ४०० बस दैनिक सेवेत असून, लवकरच १०० टक्के क्षमतेने सेवा सुरू करण्याचा महामंडळाचा मानस आहे.
...
कोट
उत्पन्नवाढीसाठी विविध मार्गांतून उपाय शोधले जात आहेत. २७ जानेवारीनंतर शाळा पूर्णत: सुरू झाल्यावर उत्पन्नात भर पडेल. लवकरच पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करणार आहोत. पर्यटन बससेवेसाठी नागरिकांपर्यंत पोहोचून जनजागृती केली जाणार आहे.
- नीलेश बेलसरे, रा.प.मं. विभाग नियंत्रक, नागपूर