नागपूर : कोणत्याही परिस्थितीत एसटीचे शासनात विलीनीकरण शक्य नाही असा निर्णय शासनाने दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुद्धा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० मार्चपर्यंत कामावर परतल्यास कारवाई मागे घेण्यात येणार आहे. परंतू कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकणार नसून आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू त्यानंतर आमची भूमिका ठरवू असा पावित्रा संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बैठकीचे आयोजन केले. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर कोणीही कर्मचारी कामावर परत जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला. अंतिम टप्प्यात आता न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाबाबत तीन सदस्यीय समितीने विलीनीकरणाची मागणी नाकारली आहे. त्यामुळे समितीचा अहवाल योग्य असल्याचे सांगून शासनाने सुद्धा विलीनीकरणास नकार दिला आहे.
कामावर परतल्यास कारवाई होणार नाही
‘कामावर रुजू होण्यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांना सात दिवसांचा वेळ दिला आहे. कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आधी केलेली कारवाई मागे घेण्यात येईल. परंतू कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुढील रस्ता नेहमीसाठी बंद होईल.’
-नीलेश बेलसरे,विभाग नियंत्रक,एसटी महामंडळ,नागपूर विभाग