नागपूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संप आणखी तीव्र केला आहे. रविवारी नागपूर आगारातील ८ पैकी ३ डेपोतून बस वाहतूक सुरू होती. पण सोमवारी संपूर्ण डेपोतील कर्मचारी संपात सहभागी झाले. एसटीच्या गणेशपेठेतील बसस्थानकारून एकही बस सोमवारी सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आणि मनमानी भाडेवाड केली आहे.
गणेशपेठ बसस्थानकाच्या अगदी शेजारीच खासगी ट्रॅव्हल्स विदर्भातील जिल्ह्यांसाठी सुटतात. बाहेरगावहून आलेले प्रवाशी एसटी बंद असल्याने निराश होवून ट्रॅव्हल्सकडे जात आहे आणि ट्रॅव्हल्सवाले त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत मनमानी शुल्क वसूल करीत आहे. ट्रॅव्हल्सवाल्यांनी दुप्पटच दरवाढ केली आहे.
भंडाऱ्याला जाणाऱ्या प्रवाश्यांकडून २०० रुपये घेतले जात आहे. चंद्रपूरसाठी ४०० तर अमरावतीसाठी ५०० रुपये भाडे झाले आहे. प्रवाश्यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावी परतायचे असल्याने ट्रॅव्हल्समध्ये चांगलीच गर्दी होत आहे. प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता ट्रॅव्हल्समालकांनी काही अतिरिक्त ट्रॅव्हल्स महत्वाच्या मार्गावर वाढविल्या आहेत.
दुसरीकडे बाहेरच्या राज्यातून येणारे प्रवाशी बसस्थानकावर पोहचत आहे. पण संपूर्ण बसस्थानक रिकामे असल्याने काहीवेळ प्रतिक्षा करून ट्रॅव्हल्सद्वारे पुढचा प्रवास करीत आहे. तिकडे एसटी महामंडळाचे कर्मचारी नागपूर आगाराच्या द्वारावर, मोक्षधामच्या डेपोसमोर ठिय्या देऊन बसले आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. राज्यस्तरावर कर्मचाऱ्यांच्या नेत्यांच्या सरकारसोबत बैठका चर्चा सुरू आहेत. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे.
- सणांच्या तोंडावर संप नको
सणासुदीचे दिवस सुरू आहे. लहान मुलांना घेऊन कुटुंबासह तुमसरला जायचे होते. बसस्थानकावर आलो तर एसटी बंद आहे. भंडाऱ्याचे खासगी ट्रॅव्हल्सवाले २०० रुपये घेत आहे. एसटीच्या संपामुळे प्रवाश्यांच्या खिशालाच चोट आहे.
रुपेश पलांदूरकर, प्रवासी
- पर्यायच नाही, तर पैसे मोजावेच लागतील
कालपासून एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. आम्ही कालच जात होतो, पण आज संप संपेल अशी अपेक्षा होती. काल ट्रॅव्हल्सचेही दर नेहमीप्रमाणेच होते. पण आज त्यांनी दुप्पटच दर केले आहे. आता आम्हाला जायचेच असल्याने आणि पर्यायही नसल्याने पैसे मोजावेच लागेल.
नरेश सावरबांधे, प्रवासी