नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी होत आहे. आता एसटी बसेसच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून गणेशपेठ बस स्थानकावरही प्रवाशांची अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नसून, त्यांना आल्यापावली घरी परतावे लागणार आहे.
एसटीच्या बसमधून अत्यावश्यक कारणासाठीच प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे, परंतु एखाद्या प्रवाशाला कोरोनाची बाधा झाली असल्यास, इतर प्रवाशांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेचा चमू बुधवारपासून गणेशपेठ बस स्थानकावर प्रवाशांची तपासणी करीत आहे. दररोज २५० प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. एखादा प्रवासी पॉझिटिव्ह निघाल्यास, त्याला प्रवासाची परवानगी नाकारून घरी परत पाठविण्यात येणार आहे, परंतु दोन दिवसांत एकही प्रवासी पॉझिटिव्ह निघाला नसल्याची माहिती एसटीचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली. कोरोनाच्या धास्तीने अनेक जण टेस्ट करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे बस स्थानकावरील प्रवाशांची संख्या घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
............