नरेश डोंगरेनागपूर : राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल करण्याचे नियोजन केले आहे. कोणताही आवाज न करता सुसाट वेगाने धावणाऱ्या या बसेस प्रवाशांना आरामदायक प्रवासाची अनुभूती देणार आहेत. शीर्षस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर विभागात १९६ इलेक्ट्रिक बस येण्याची शक्यता आहे. त्यासंबंधाने येथील एसटीच्या अधिकाऱ्यांनी नियोजन केले असून तशी व्यवस्थाही झाली आहे. या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने येणार असून पहिल्या टप्प्यात किती येणार आणि जूनपर्यंत येणार की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत ते मात्र स्पष्ट झालेले नाही.
प्रत्येक जिल्हास्थळी चार्जिंग सेंटरया सर्व बसेस इलेक्ट्रिक असल्यामुळे त्यांना चालवायचे म्हटले की चार्जिंगही कराव्या लागणार. त्यामुळे त्यांचे चार्जिंग सेंटर ठिकठिकाणी निर्माण करण्याची योजना आहे. नेमके किती आणि कोणत्या शहरात चार्जिंग सेंटर उभारायचे, याचा तूर्त निर्णय झाला नाही. मात्र, प्रत्येक जिल्हास्थळी चार्जिंग सेंटर तयार केले जाणार आहे. त्याचा ढोबळमानाने हिशेब लावल्यास विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह ११ ठिकाणी चार्जिंग स्टेशन राहणार आहेत.
शिवशाहीपेक्षा भाडे जास्त की...?
या नव्या कोऱ्या आणि आरामदायक प्रवासाची अनुभूती देणाऱ्या बसेस असणार आहेत. सध्याच्या बसेसचा विचार केल्यास साध्या बसेसच्या तुलनेत शिवशाही बसेसचे भाडे जास्त आहे. त्यामुळे या नव्या इलेक्ट्रिक बसेसचे भाडे शिवशाहीपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. मात्र, तसे कोणतेही परिपत्रक अधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे भाड्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांकडे माहिती नाही, त्यांना तशी कल्पनाही नाही.
महत्त्वाच्या मार्गावर चालणार इलेक्ट्रिक बसनागपूर-विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या आणि प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या मार्गावर या बसेस धावणार आहेत. तूर्त या बसेस ग्रामीण भागात चालणार की नाही, त्याबाबत निर्णय झालेला नाही.
एसटीच्या साध्या बसही मिळणार
या नव्या इलेक्ट्रिक बसेस सोबतच एसटीच्या साध्या बसेसही मोठ्या संख्येत महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. त्या किती येणार आणि कधी येणार, हे निश्चित नसले तरी किमान १० बसेस पुढच्या महिन्यापर्यंत नागपूर विभागाला मिळणार असल्याचे समजते.
नवीन इलेक्ट्रिक बसेस आल्यानंतर निश्चितपणे प्रवाशांची संख्या वाढेल आणि एसटीच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी अपेक्षा आहे. नव्या बसेसबाबतचे नियोजन केले जात आहे.-श्रीकांत गभणे,
उपमहाव्यवस्थापक, एसटी महामंडळ, नागपूर.