प्रवासी घटणार : उत्पन्नावर मर्यादा येण्याची भीती
नागपूर : अनलॉकनंतर एसटी बसेस मोठ्या संख्येने रस्त्यावर धावू लागल्या होत्या. परंतु पुन्हा प्रशासनाने विकेंड लॉकडाऊन आणि दुपारी ४ पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी अडचणीत सापडली असून प्रवाशांची संख्या घटून उत्पन्नावर मर्यादा येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून एसटीचे उत्पन्न ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही एसटीकडे पैसे नसल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर विविध सवलतींचे महाराष्ट्र शासनाकडे असलेले पैसे मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला होता. अनलॉकनंतर एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली होती. नागपूर विभागात दिवसाकाठी ९५ हजार किलोमीटरच्या फेऱ्या चालविण्यात येत असल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली होती. १०० टक्के क्षमतेने एसटी बसेस चालविण्यात येत होत्या. म्हणजे एका बसमध्ये ४४ प्रवासी आणि स्टँडींग प्रवाशांना मनाई करण्यात येत आहे. सोमवारपासून मध्य प्रदेशातील वाहतूक सुरू करून १ लाख २४ हजार किलोमीटरचा टप्पा गाठण्याचे ध्येय एसटीने ठेवले होते. परंतु कोरोनामुळे पुन्हा विकेंड लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली. दुपारी ४ पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा एसटीची प्रवासी संख्या कमी होणार आहे. यात उत्पन्नावर मर्यादा येणार असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती पुन्हा बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुन्हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
............