लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अडकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी एसटी कामगार संघटनेने आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रोश आंदोलन केले. पदाधिकारी, कार्यकर्ते संघटनेच्या कार्यालयात जमले. त्यांनी वेतनासाठी नारेबाजी केली. जे कर्मचारी घरी आहेत त्यांनी कुटुंबीयांसह घराच्या गेटसमोर येऊन नारेबाजी केली.
एसटी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन रखडले आहे. हे वेतन मिळण्यासाठी एसटी कामगार संघटनेने वेळोवेळी महामंडळाकडे पाठपुरावा केला. परंतु कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी प्रशासनाने काहीच पाऊल उचलले नाही. त्यामुळे एसटी कामगार संघटनेने ७ तारखेला वेतन न झाल्यास ९ तारखेला आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळपासून आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली. पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या घराच्या गेटसमोर येऊन नारेबाजी केली. सोबतच संघटनेच्या कार्यालयातही पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. संघटनेच्या आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यात येईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. यावेळी संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले, विभागीय अध्यक्ष प्रशांत बोकडे, विभागीय कार्याध्यक्ष जगदीश पाटमासे, रवी सोमकुवर, प्रशांत उमरेडकर, पद्माकर चंदनखेडे, मो. इम्रान, माधुरी ताकसांडे, मनोज बगले, एन. डी. गणेश, प्रमोद बीडकर, गणेश मेश्राम, मो. आरिफ, गजू शेंडे, योगेश उकंडे, मनोज श्रीवास्तव यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे एसटीचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील जळगाव येथील मनोज चौधरी या वाहकाने सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूस महाराष्ट्र शासन व एसटी प्रशासन जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. तर रत्नागिरी येथील चालक पांडुरंग गडगे यांनीही आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. वेतन नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागत असून कुटुंबासमोर तसेच समाजासमोर त्यांची नाचक्की होत आहे. त्यामुळे शासनाने थकबाकीसह एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची गरज असल्याचे मत एसटी कामगार संघटनेचे नागपूर प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी व्यक्त केले.