लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने महागडा माेबाईल फाेन चाेरून नेला. मात्र, पाेलिसांनी घटनेच्या काही तासातच आराेपीला ताब्यात घेत अटक केली आणि त्याच्याकडून ९४ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला. चाेरीची ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडखैरी शिवारात घडली.
पवन निवृत्ती व्यवहारे (२५, रा. देशमुखवाडा, बाजार चाैक, कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. स्टेलर व्हॅल्यू चेन साेल्युशन नामक कंपनीचे गाेंडखैरी शिवारात वेअर हाऊस असून, पवन या कंपनीमध्ये नाेकरी करायचा. त्या वेअर हाऊसमध्ये विविध इलेक्ट्राॅनिक्स वस्तू ठेवण्यात आल्या असून, तिथे आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात पवनचा समावेश हाेता. येथील वस्तूंचा ऑर्डरप्रमाणे पुरवठा केला जाताे. आतील वस्तू बाहेर नेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना पिक स्लिप दिली जाते.
दरम्यान, येथील दाेन कर्मचाऱ्यांना महागड्या माेबाईलचा बाॅक्स रिकामा असल्याचे लक्षात आले. त्यांच्या सांगण्यावरून व्यवस्थापक याेगेश विजय पिल्ले, रा. दीपकनगर, नागपूर यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ३८१ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले. पाेलीस कर्मचाऱ्यांना विचारपूस करीत ही चाेरी पवनने केल्याच्या निष्कर्षावर पाेहाेचले. कळमेश्वर शहरातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने चाेरी केल्याचे मान्य केले. त्यामुळे पाेलिसांनी त्याच्याकडून ९४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली. ही कारवाई मन्नान नाैरंगाबादे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.