लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक बंधने शिथिल केली आहेत. आता विमानतळावर घरगुती उड्डाणांनी ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर लावण्यात येणारा १४ दिवसांचा क्वारंटाईनचा स्टॅम्प आता लावण्यात येणार नाही. प्रवाशांचे केवळ तापमान तपासण्यात येणार आहे. निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रूही यांनी सांगितले, या संदर्भात राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्याअंतर्गत घरगुती उड्डाणांनी येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा स्टॅम्प लावण्यात येणार नाही. या संदर्भात मनपाकडून गुरुवारी सकाळी आदेश मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर विमानतळावर स्टॅम्पिंगची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. विमानतळावर कोरोना नियंत्रणासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे.