अजब नियम : दंडाच्या नावावर जबरन वसुलीनागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले असून काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, मात्र दुसरीकडे चुकीचे चालान पाठविले जात असल्याने डोकेदुखी वाढली आहे. एका वाहनचालकाने दुसऱ्याला वाहन विकताना नियमानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली, परंतु तरीही हेल्मेट न घालता वाहन चालविल्याचे ई चालान जुन्या वाहन मालकाच्या नावाने आले तर एक तरुणी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसली असताना केवळ मोबाईल पाहिला म्हणून तिच्या फोटोसह चालान पाठविले. यासारखे अनेक प्रकार सामोर येत असून त्याचे खंडन करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. चिखली चौक येथील वाहन पार्किंगच्या ठिकाणी एक युवती एमएच ३१ सीयू ८८७९ या दुचाकीवर बसली होती. याच दरम्यान तिचा मोबाईल फोन वाजला. कुणाचा फोन आहे असे म्हणून पाहताच चौकातील वाहतूक पोलिसांनी फोटो काढून घेतला. तिला ई-चालान पाठविले. यात मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/७७ मोबाका अन्वये चालान कारवाई करण्यात आल्याचे नमूद करून ५०० रुपये दंड भरण्याची अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल करण्याची सूचना केली आहे. त्या युवतीने ‘लोकमत’ला सांगितले, चौकात पार्किंगच्या ठिकाणी इतर वाहने उभी असताना तिथे केवळ दुचाकीवर बसून मोबाईल पाहिला म्हणून जर चालान दिले जात असेल तर हा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार आहे. हे थांबायला हवे, असेही ती म्हणाली. दुसऱ्या एका प्रकरणात, सतीश मोहोड यांनी चार वर्षांपूर्वी आपली दुचाकी विकली, नियमानुसार दुचाकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वाहन प्रणालीवर दुचाकी विकत घेणाऱ्याच्या नावाची नोंदही झाली आहे. असे असताना ‘एमएच ३१ बीएन ७००१’ हे वाहन ओमकार नगर चौकात विना हेल्मेट दुचाकी चालवित असल्याचे कारण दाखवित ई चालान जुन्याच वाहन मालकाला पाठविले. चालान नाकारण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यालयाच्या चकरा मारण्यासाठी आपला वेळ का घालवावा, असा प्रश्न मोहोड यांना पडला आहे. वाहतूक विभागाची ई-चालान प्रणाली चांगली असलीतरी दोषी व्यक्तीलाच त्याचे चालान पाठविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मोहोड यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)
हेल्मेटशिवाय दुचाकीजवळ उभे राहणेही ‘गुन्हा’
By admin | Published: April 24, 2017 2:01 AM