लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मनपाची मार्च महिन्यातील सभा रद्द करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातही बैठकींना पूर्णविराम मिळाला. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी १२.३० वाजता मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत विकासकामांसंदर्भात एकही फाईल नाही. अग्निशमन विभागातर्फे ३२ मीटरच्या हायड्रोलिक प्लेटफॉर्म मशीन, अग्निशमन विभागात ११ महिन्यांच्या कंत्राटी फायरमॅन ड्रायव्हरची नियुक्ती, जकात विभागाने जप्त केलेल्या साहित्यांचा लिलाव, नदी-सरोवर व पाणीपुरवठा प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लगाराच्या नियुक्तीला सहा महिने मुदतवाढ आदी प्रस्ताव बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत.बैठकीच्या माध्यमातून प्रशासनाला स्थायी समिती धारेवर धरू शकते. परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर समितीच्या मुद्यांना प्रशासनाकडून बगल मिळण्याची शक्यता आहे. बैठकीसाठी पाच लोकांनाच परवानगी आहे. अशा परिस्थितीत सदस्य काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पिंटू झलके यांना पूर्ण क्षमतेने कामाला सुरुवात करण्याची संधी मिळालेली नाही. सुरुवातीला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आर्थिक टंचाईचे कारण पुढे करून विकास कामांना ब्रेक लावले. दरम्यान, कोरोना संक्रमणाचा कालावधी सुरू झाला. यात त्यांचा तीन महिन्यांचा कालावधी निघून गेला. अद्याप अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला नाही. पावसाळा सुरू होताच अर्थसंकल्प सादर केला जाईल. परंतु पावसाळ्यामुळे कामांना सुरुवात करता येणार नाही.
लॉकडाऊनमध्ये आज नागपूर मनपा स्थायी समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 11:57 PM