लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उर्दू ही मराठी गजलेची जननी आहे आणि हळूहळूच का होईना मराठीने गजलेमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आता मराठीच्या भगिनी असलेल्या बोलीभाषांमध्येही गजल व्हाव्या तरच, मराठीने पूर्णत: गजल व्यापली असे म्हणता येईल. अशी भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ते एका खाजगी कार्यक्रमानिमित्त नागपूरला आले असता पत्रकारांशी बोलत होते.मराठीत गजल आता स्थिरावली असे म्हणता येईल. मात्र, व्यापक अर्थाने गजल मराठीत रुजायची असेल तर बोलीभाषांनीही गजल स्वीकारायला हवी. खान्देशातील काही मंडळींनी मराठीज गजल लिहून पाठविल्या होत्या. तेव्हा त्यांना तुमच्या बोलीभाषेत अहिराणीमध्ये गजल लिहा, असा आग्रह धरला. तेव्हापासून अहिराणी, गोंडी, कोंकणी, वºहाडी बोलीभाषेत मोठ्या प्रमाणात गजल लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. झाडीबोलीमध्ये अजून तरी गजल लिहिण्यास सुरुवात झाली नाही. मात्र, पुढेमागे त्याही बोलीभाषेत गजल येतील, असा आशावाद पांचाळे यांनी व्यक्त केला. मराठीमध्ये गजल स्थिरावली असली तरी त्याचा वेग कमी आहे. जे अभिजात असते, त्याचा वेग कमी आणि प्रवास अवघडच असतो. तो हळूहळू रुचतो, रुजतो आणि त्याचा आनंद जसजसा घेता येतो, तसतसा अभिजात कला हृदयात उतरत असल्याचेही ते म्हणाले. १९७२ साली मी पहिली मैफिल केली होती. तेव्हापासून गेल्या ४८ वर्षाचा आनंद मी घेतला आहे. आज मला मराठी गजल कार्यक्रमांसाठी १७-१८ देशांतून सातत्याने आमंत्रणे येतात. सुरेश भटांच्या काळात ७०-८० गजल लिहिणारे होते. आज ५०० च्या वर मराठी गजलकार आहेत. नऊ मराठी गजल संमेलने झाली आणि १०८ मराठी गजलेच्या कार्यशाळा झाल्या आहेत. त्यामुळे, हळूहळू मराठी गजल नवी पिढीही स्वीकारत असल्याचे भीमराव पांचाळे म्हणाले.
मराठीत स्थिरावली, आता बोलीभाषेतही गजल व्हाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 1:11 AM
आता मराठीच्या भगिनी असलेल्या बोलीभाषांमध्येही गजल व्हाव्या तरच, मराठीने पूर्णत: गजल व्यापली असे म्हणता येईल. अशी भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्दे गजलनवाज भीमराव पांचाळे यांची भावना