लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावांचा समावेश आहे. कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची मागणी करणाऱ्या ‘जी-२३’चे नेते गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल यांना स्थान देण्यात आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. यात ‘जी-२३’ गटातील मनीष तिवारी व जितीन प्रसाद याच नेत्यांचा समावेश आहे. प्रसाद हे कॉंग्रेसचे पश्चिम बंगाल प्रभारी आहेत. पक्षात कुठलीही गटबाजी नसून सर्व एकत्र आहेत. तसेच सोबत प्रचार करू असे वक्तव्य आनंद शर्मा व गुलामनबी आझाद यांनी दिले होते. मात्र त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळालेले नाही.
स्टार प्रचारकांच्या यादीत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नावांचा समावेश आहे.