मनपा अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपली बससेवा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कामगारांना जादा पैसे मोजावे लागत आहे. याचा विचार करता शुक्रवारपर्यंत बससेवा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे व प्रशांत पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांना बुधवारी दिलेल्या निवेदनातून दिला.
अनलॉक प्रक्रिया सर्व स्तरावर सुरू झाली आहे. मेट्रो रेल्वे सुरू झाली. मात्र सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली आपली बस सुरू झाली नाही. यामुळे कष्टकरी वर्गाला जादा पैसे मोजावे लागत आहे. आवश्यक खबरदारी घेऊन शुक्रवारपर्यंत बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
बस सुरू न केल्यास मनपा मुख्यालयात आंदोलन करू, असा इशाराही दिला. यावेळी दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, श्रीकांत शिवणकर, अविनाश शेरकर, रवी पराते, रियाल शेख, मुरू शेख यांच्यासह जय जवान, जय किसान संघटनेचे कार्यकते उपस्थित होते.