कोराडी : तीन वर्षांपासून रखडलेली व प्रारंभ होण्यापूर्वीच बंद पडलेली बोखारा येथील मुख्यमंत्री पेयजल-२ मधील पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १८ फेब्रुवारीपासून सुरू करावी अन्यथा मजीप्रा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आ. समीर मेघे आणि ग्रामस्थांनी दिला आहे. बोखारा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ग्रामपंचायतचे पदाधिकारी, मजीप्राचे अधिकारी व आमदार समीर मेघे यांची बैठक झाली. ही योजना तीन वर्षांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही मजीप्राची कामे संपलेली नाहीत. मध्यंतरीच्या काळात या योजनेची टेस्टिंग सुरू असताना दोन ते तीन महिने पाणी वापरण्यात आले. या योजनेला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पाणी विकत देण्यात येते. या पाण्याचे व या ठिकाणी असलेल्या वीजपुरवठ्याचे १५ लाख थकीत असल्याने ही योजना टेस्टिंगनंतर लगेच बंद पडली. ग्रामपंचायत व मजीप्रामध्ये पैसे भरण्यावरून मतभेद आहेत. यावर तोडगा निघावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ग्रामपंचायतने थकीत असलेली राशी १७ फेब्रुवारीपर्यंत भरावी. योजनेची राहिलेली कामे आठवडाभरात मजीप्राने पूर्ण करावी. १८ फेब्रुवारीपासून बोखारावासीयांना पाणी द्यावे असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सरपंच अनिता पंडित, मजीप्राचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी एन. एस. निमजे, बोखारा येथील बाबा नागपूरकर, बाबा पंडित, विलास भालेराव, बापू देशमुख, पी. एस. महाडिक, ज्ञानेश्वर डोक, डॉ. सुमित घोंगडे, जावेद शेख सुलेमानी, गोपाल चव्हाण, सुप्रिया आवळे, जितेंद्र पिंपळे, मंगेश सावरकर, सुखदेव भोंडे, पद्मिनी कोठेवाड, विद्या चालसे आदी उपस्थित होते.
विशेष बैठकीचे आयोजन करून तोडगा काढू
या योजनेची दहा लाखाची थकीत राशी ग्रामपंचायतला भरावयाची आहे. यावरून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. पैसे कुठून भरायचे यावरही एकमत झालेले नाही. अशा स्थितीत ग्रामपंचायतची विशेष बैठक बोलावून ही रक्कम भरण्यासंदर्भात सकारात्मक तोडगा तोडगा काढू, असे सरपंच अनिता पंडित यांनी सांगितले.