लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : उमरेड आगारातून सुरू असलेली मांढळ-आंभाेरा बसफेरी ही पुढे तारणा-पखखेडी मार्गे सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी पचखेडी, पारडी व चाळा येथील नागरिकांनी आ. राजू पारवे तसेच उमरेड आगारप्रमुखांकडे नुकतेच निवेदन साेपविले आहे.
नागभीड नॅराेगेज रेल्वे मार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर हाेणार असल्याने नागपूर-नागभीड रेल्वे बंद आहे. त्यामुळे पचखेडी, चाळा, मालची, ब्राह्मणी, आपतूर, गावसूत या गावातील नागरिकांना वाहतूक साधनांची समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला, दूध शहरापर्यंत पाेहचविता येत नाही. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासाची अडचणीचे ठरत आहे. या भागातील गावकऱ्यांना कुही तालुकास्थळी महत्त्वपूर्ण कामे तसेच दवाखाना, बाजारपेठेत कुही येथे ये-जा करावी लागते. मात्र वाहतुकीचे साधने नसल्याने गावकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे तारणा- पचखेडी मार्गे दिवसातून किमान तीन बसफेऱ्या सुरू केल्यास एसटी महामंडळाला आर्थिक लाभ हाेईल व नागरिकांची गैरसाेय टाळता येईल. तसेच नागपूर-वग ही मुक्कामी बसफेरी पारडी येथे मुक्कामी ठेवल्यास परिसरातील गावकऱ्यांना नागपूरला ये-जा करणे साेईचे हाेईल. याकडे लक्ष पुरवून ही बसफेरी सुरू करण्याची मागणी नरेश शुक्ला, पुरुषोत्तम पोटे, विलास बावनगडे, विनय गजभिये, प्रमोद कांबळे, लीलाधर मंदिरकर, दिनेश चौधरी यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.