खापा : राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील एसटी बससेवा अद्याही पूर्ववत सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत असल्याने, बससेवा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची साेय नसल्याने, बहुतांश गावांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी जवळच्या शहरात अथवा गावांमध्ये जातात. ते शाळेत ये-जा करण्यासाठी बसचा वापर करतात. काेराेना संक्रमणामुळे शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली हाेती, शिवाय बसफेऱ्याही बंद केल्या हाेत्या. संक्रमण कमी हाेताच शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच एसटी महामंडळाने माेठ्या शहरांना जाेडणारी बससेवा सुरू केली असून, ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरू करण्यात आली नाही. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. खासगी वाहने वेळेवर मिळत नसल्याने तसेच अनेकांकडे वाहनांची साेय नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. ही गैरसाेय दूर करण्यासाठी ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.