लाेकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाजारगाव व परिसरातील गावांमधील लाेकसंख्येची घनता अधिक आहे. येथील नागरिकांना काेराेना टेस्ट करण्यासाठी वाडी अथवा नागपूरला जावे लागते. त्यामुळे संक्रमित रुग्णांची वेळीच माहिती मिळत नसल्याने या भागात काेराेना संक्रमणाचा धाेका वाढला आहे. त्यामुळे बाजारगाव येथे काेराेना चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी सरपंच तुषार चाैधरी यांच्यासह या भागातील नागरिक व कामगारांनी केली आहे.
बाजारगावची लाेकसंख्या १० हजारांपेक्षा अधिक असून, या भागात काही कंपन्या व उद्याेग असल्याने वास्तव्याला असणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागातील लाेकसंख्येची घनता वाढली आहे. बहुतांश कामगार अजूनही कामावर जात असून, ते कुटुंबीयांसह वावरत आहे. पूर्वी बाजारगाव येथे काेराेना चाचणी केली जात असल्याने लक्षणे आढळून येताच नागरिक स्वत:हून चाचणी करवून घ्यायचे. त्यामुळे वेळीच उपचार करणे व काळजी घेणे साेपे जायचे.
दाेन महिन्यांपासून येथील काेराेना चाचणी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे काेण पाॅझिटिव्ह व काेण निगेटिव्ह हे कळायला मार्ग नसल्याने नागरिक कुटुंबीयांसह इतरांच्या संपर्कात येत आहेत. थाेडीफार लक्षणे आढळून येताच कामगारांना टेस्ट करण्यासाठी वाडी अथवा नागपूरला जावे लागते. यात वेळ व पैसा खर्च हाेत असल्याने गरीब कामगार वाडी किंवा नागपूरला टेस्ट करण्यास जाणे टाळतात. त्यामुळे ही साेय पूर्वीप्रमाणे बाजारगाव येथे करावी, अशी मागणी सरपंच तुषार चाैधरी यांच्यासह कामगार व नागरिकांनी केली आहे.
...
दाेघांचा मृत्यू
या भागात काेराेना संक्रमण आहे. आजवर बाजारगाव येथे १९ तर शिवा येथे २१ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १७ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती व्याहाड येथील प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैद्य यांनी दिली. लस ही काेराेना संक्रमण राेखण्यासाठी एकमेव उत्तम उपाय आहे. त्यामुळे ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी पहिला तर ज्यांनी पहिला डाेस घेतला आहे, त्यांनी दुसरा डाेस घ्यावा. यासाठी व्याहाड प्राथमिक आराेग्य केंद्र किंवा शिवा येथील ॲलाेपॅथी दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन डाॅ. वैद्य यांनी केले आहे.