वाडी : साेनेगाव (निपानी) जिल्हा परिषद सर्कलमधील डिफेन्स परिसरात १०० खाटांचे काेविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना साेमवारी निवेदन साेपविण्यात आले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या मार्गदर्शनात जि. प. शिक्षण सभापती भारती पाटील, नागपूर पंचायत समितीच्या सभापती रेखा वरठी, साेनेगावच्या सरपंच तेजस्विनी धुर्वे, वाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश थाेराणे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
डिफेन्स, अंबाझरी, वाडी, सुराबर्डी, दवलामेटी व परिसरात अंबाझरी डिफेन्स येथील कर्मचारी राहतात. डिफेन्स, अंबाझरी परिसरात आयएसओ प्रमाणित रुग्णालय असून, तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागताे. अंबाझरी फॅक्टरीतील अधिकाऱ्यांची चर्चा करून डिफेन्स परिसरात १०० खाटांचे काेविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आशिष पाचघरे, महावीर व्यास, सचिन थोराने, अनंत भारसाकडे, सुदर्शन मेश्राम, अविनाश रंगारी, विनोद कुमार, जयकुमार पिल्ले आदी उपस्थित होते.