लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : काटाेल व नरखेड तालुक्यातील, तसेच नरखेड शहरातील शासकीय व खासगी शाळा सुरू करण्यात आल्या असून, इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थी नियमित शाळांमध्ये जात आहेत. मात्र, काटाेल शहरातील शाळा अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे हाेणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, शहरातील आठवी ते बारावीपर्यंतच वर्ग सुरू करण्यात यावे, अशी मागणी सिटिझन फाेरमच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून, नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बाेरीकर यांच्याकडे निवेदन साेपविले आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये जुलैमध्ये काटाेल तालुक्यातील शासकीय व खासगी शाळांमधील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तत्पूर्वी प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणी व काेराेना प्रतिबंधक लसीकरणही करण्यात आले आहे. काटाेल शहरातील शाळांमध्ये काटाेल व नरखेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील किमान ७० टक्के विद्यार्थी शिकायला येतात. बहुतांश विद्यार्थी राेज बसने प्रवास करीत असून, बसेसही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत.
शहरातील शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. ते टाळण्यासाठी साेमवार (दि. २३)पासून शहरातील शाळा फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, स्किनिंग टेस्टचे पालन करीत सुरू करण्यात याव्या, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सिटिझन फोरमचे प्रा.विजय कडू, डाॅ.अनिल ठाकरे, मनोज जवंजाळ, ॲड.प्रवीण लव्हाळे, नगरसेवक सुकुमार घोडे, भूपेंद्र चरडे, प्रताप ताटे, मुकुंद दुधकवळे, विजय महाजन, गुणवंत भिसे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.
...
विद्यार्थ्यांची ७० टक्क्यांपर्यंत उपस्थिती
काटाेल तालुक्यातील शासकीय व खासगी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात ३९ खासगी, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये राेज प्रत्येकी ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच शिक्षकांना शाळा सुरू झाल्यापासून आजवर ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोना अथवा डेंग्यूची काेणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, असेही सिटिझन फाेरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
...