लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाला अमरावतीमध्ये लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. करिता अमरावतीमध्ये कोरोना निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी अशा विनंतीसह भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.अमरावतीमधील विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यापर्यंत कोरोना कुठून पोहोचला याचा शोध प्रशासनाला लागला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात वाईट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासन त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावण्यात अपयशी ठरत आहे. लॉकडाऊनमध्ये शहरवासी गर्दी करीत आहेत. रोडवर बिनधास्त फिरत आहेत. त्यातून कोरोनाचा वेगात प्रसार होण्याची भीती आहे. काही प्रकरणांमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. प्रशासनाने केवळ त्या रुग्णांच्या कुटुंबियांवरच लक्ष केंद्रित केले आहे. अन्य परिसरांकडे दूर्लक्ष केले जात आहे. परिणामी, अमरावतीमध्ये कोरोना नियंत्रणात राहण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
राज्य सरकारला नोटीसया प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. पंकज नवलानी यांनी कामकाज पाहिले.