लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे इतवारी स्टेशन व्यापारी संघटनेतर्फे रेल्वेस्थानकापासून ते टाटानगरपर्यंत पार्सल गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेने रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खा. विकास महात्मे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांना पत्र लिहिले आहे. इतवारी रेल्वेस्थानक हे कळमना तसेच इतवारी बाजारपेठेजवळ आहे. तेथून छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, बंगाल इत्यादी राज्यात पार्सल पाठविण्यात येत होते. मागील वर्षी या गाडीच्या ऐवजी इतवारी-खडकपूर स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. यातून दररोज ८० ते ९० टन माल पाठविण्यात येत होता. मात्र १ एप्रिलपासून तीदेखील बंद करण्यात आली. इतवारीतून ड्रायफ्रूट, प्लास्टिक पाईप, प्रिंटिंग इंक, जोडे-चप्पल, कूलर, ताडपत्री, सोनपापडी, चॉकलेट, मिरची, हळदीची पावडर, रेडीमेड कपडे, उदबत्त्या, इत्यादी पार्सल बुक होतात. याचे लोडिंग व अनलोडिंग करण्यासाठी अनेक कामगारांना रोजगार मिळतो. गाडी बंद झाल्याने कामगार व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी. सोबतच मुंबई-शालिमार पार्सल कोविड गाडी इतवारी स्थानकातून जाईल, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.