लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : काेराेनाची दुसरी लाट ओसरताच ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालय सुरू झाले आहेत. परंतु एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बसफेऱ्या विशेषत: मुक्कामी बसफेऱ्या अद्यापही सुरू केल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. रेवरालसह परिसरातील गावातील शेकडाे विद्यार्थी माैदा येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र काेदामेंढी-माैदा ही मुक्कामी बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे काेदामेंढी-माैदा ही मुक्कामी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी जि.प. सदस्य राधा अग्रवाल यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
धानला, पिपरी, खंडाळा, सुंदरगाव, चारभा, चिचाेली, रेवराल परिसरातील शेकडाे विद्यार्थी माैदा तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करतात. काही विद्यार्थ्यांचे शाळा-महाविद्यालय सकाळ पाळीत तर काहींचे वर्ग दुपार पाळीत भरत आहेत. सकाळ पाळीतील विद्यार्थ्यांना मुक्कामी बसफेरी साेयीची हाेती. परंतु काेराेना काळापासून ही बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रवास करणे कठीण झाले आहे. धानला, खंडाळा, पिपरी, चारभा व रेवराल येथील विद्यार्थी दुचाकी व इतर वाहनाने बाेरगाव थांबापर्यंत येतात. मात्र ज्यांच्याकडे वाहनाची साेय नाही, अशांना मिळेल त्या वाहनाने बाेरगाव थांबा गाठावा लागताे. बाेरगाव थांबा येथे हात दाखवूनही बसेस थांबत नाही, यामुळेही विद्यार्थ्यांना शाळेत पाेहाेचण्यास उशीर हाेताे. विद्यार्थ्यांची हाेणारी गैरसाेय पाहता एसटी महामंडळाने बाेरगाव येथे बसेसला थांबा द्यावा तसेच काेदामेंढी-माैदा ही मुक्कामी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.