महापौरांचे निर्देश : बजेटमध्ये तरतूद करणार
नागपूर : केटीनगर रुग्णालयात महापालिकेचा महिला दवाखाना व सूतिकागृह सुरू करा, तसेच रुग्णांसाठी लिफ्ट लावण्यासाठी मनपाच्या पुढच्या बजेटमध्ये प्रावधान करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी दिले. केटीनगर येथील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीप्रसंगी दिले.
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या कार्यरत आहे. या रुग्णालयात महिलांसाठी दवाखाना व सूतिकागृह सुरू केल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापौरांनी आयुर्वेदिक ले-आऊट येथील कोरोना चाचणी केंद्रालाही आकस्मिक भेट दिली. येथे बॅरिकेडिंग, टिन लावणे, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच नागरिकांसाठी ग्रीन मंडप टाकण्यात आला आहे. आरोग्य सेवकांसाठी कूलरची व्यवस्था करण्याचे आदेश महापौरांनी दिले. यावेळी नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.