लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेनाच्या काळात ग्रामीण भागातील व्यवसाय व कामे प्रभावित झाल्याने अनेकांना आर्थिक संकटांना सामाेरे जावे लागत आहे. हातावर पाेट असणाऱ्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. अशावेळी शासनाने ग्रामपंचायत स्तरावर गावागावांत मनरेगाची कामे सुरू करावीत, जेणेकरून ग्रामीण भागातील मजुरांच्या हातांना काम मिळेल व त्यांचा उदरनिर्वाह चालेल. यामुळे ग्रामपंचायतीने मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील नवेगाव, साेनारवाही व उमरी (पुनर्वसन) या गट ग्रामपंचायतींना महात्मा गांधी राेजगार हमी याेजनेंतर्गत जलशक्ती अभियानात तिन्ही गावांमधील एकूण १४६ कुटुंबांच्या घरांना जलशक्ती अभियानाद्वारे शाेषखड्डे देण्यात आले. बुधवारी ग्रामपंचायत नवेगाव, साेनारवाही व उमरी (पुनर्वसन) येथे शाेषखड्ड्यांच्या कामाचे भूमिपूजन खंडविकास अधिकारी मनाेज हिरुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायत प्रशासक सुनील ढेंगे, माजी सरपंच नरेश चापले, कविता सहारे, राेजगार सेविका शालू अतकरी, संजू चापले, विजय ठुसे, चंदू अतकरी, अक्षय उके, तुकडू आजबले तसेच ग्रामस्थ उपस्थित हाेते.