लाेकमत न्यूज नेटवर्क
नगरधन : रामटेक तालुक्यातील नगरधन येथील वाकाटककालीन किल्ला पर्यटकांच्या तर आतील भवानीमातेचे मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. काेराेना संक्रमण काळात हा किल्ला पर्यटक व आतील मंदिर भाविकांसाठी काही काळ बंद करण्यात आले हाेते. ते अद्यापही खुले करण्यात आले नाही. त्यामुळे पर्यटक व भाविकांची गैरसाेय हाेत असल्याने हा किल्ला पूर्वीप्रमाणे खुला करण्यात यावा, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हा किल्ला प्राचीन असल्याने त्याला भेट देण्यासाठी देशातील तसेच विदेशातील पर्यटक माेठ्या संख्येने येतात. या किल्ल्याच्या आत भवानीमातेचे प्रसिद्ध मंदिर असल्याने भाविकही पूजा करण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी येथे येतात. काेरोना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आणि इतर प्रतिष्ठानांसाेबत हा किल्ला पर्यटकांसाठी तसेच आतील मंदिर भाविकांसाठी काही काळ बंद करण्यात आले.
दिवाळीनंतर राज्य शासनाने विविध व्यापारी प्रतिष्ठानांसह शाळा, महाविद्यालये तसेच मंदिरे व आठवडी बाजार सुरू करण्याला परवानगी दिली. मात्र, पुरातत्त्व विभागाकडे असलेला हा किल्ला व आतील मंदिर अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी राेज पर्यटक व भाविक येतात. किल्ला बंद असल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडते. भाविक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ भवानीमातेची पूजा करतात आणि उदास मनाने परत जातात. काेराेना संक्रमण टाळण्यासाठी शासनाने अनिवार्य केलेल्या प्रत्येक उपाययाेजनांचे पालन करीत हा किल्ला व आतील मंदिर सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे, पंचायत समिती सदस्य भूषण हाेलगिरे, सरपंच प्रशांत कामडी, उपसरपंच अमाेल मुटकुरे यांच्यासह स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
...
उपजीविकेची समस्या ऐरणीवर
या किल्ल्याला भेट देण्यासाठी वर्षभर शेकडाे पर्यटक तसेच भवानी मंदिरात पूजा व दर्शन करण्यासाठी शेकडाे भाविक येतात. त्यामुळे या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ नगरधन येथील १२ ते १५ तरुण विविध वस्तूंची तसेच पूजेच्या साहित्याची दुकाने थाटतात. या दुकानांवर त्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका चालते. किल्ला बंद असल्याने त्यांच्या उपजीविकेची समस्या ऐरणीवर आली आहे.