लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा करताच बससेवाही बंद करण्यात आली. मध्यंतरी काही मार्गावरील बससेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आली असली तरी नागपूर-हिंगणा-हिंगणी मार्गावरील बससेवा अद्यापही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी, नागपूर व विद्यार्थ्यांची माेठी गैरसाेय हाेत असल्याने या मार्गावरील बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काेराेना संक्रमणाच्या पहिल्या लाटेत लाॅकडाऊन दीर्घकाळ राहिल्याने नाेव्हेंबर-२०२० मध्ये काही प्रमाणात माेजक्याच मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली हाेती. त्यानंतर काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्याने पुन्हा टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन करण्यात आले. याही काळात अनेक मार्गावरील बससेवा बंदच हाेती. साेबतच शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तसेच मुलांचे शिक्षण ऑनलाईन सुरू असल्याने त्यांना शाळेत जाण्याची फारशी गरज भासली नाही.
परिणामी, नागपूर-हिंगणा-हिंगणी या मार्गावरील बससेवा मार्च-२०२० पासून आजवर बंदच आहे. त्यामुळे या मार्गावरील किन्ही, धानोली, मोहगाव, देवळी, पेंढरी यासह अन्य गावांमधील विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांची माेठी गैरसाेय हाेत असल्याने, त्यांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे ही बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
आंतरजिल्हा बससेवा
नागपूर-हिंगणा-हिंगणी ही बससेवा नागपूर व वर्धा जिल्ह्यातील गावांना जाेडणारी आहे. ही बस नागपूरहून सकाळी ६.३० वाजता हिंगणामार्गे हिंगणी(जिल्हा वर्धा)कडे जायला निघते. या बसवर वृत्तपत्रांचे पार्सल यायचे. ही बसफेरी बंद असल्याने वृत्तपत्रांचे पार्सल येणे बंद झाल्याने, वर्षभरापासून वृत्तपत्र वाचायला मिळत नसल्याची माहिती विद्यार्थ्यांसह नागरिकांनी दिली. या मार्गावर सध्या सकाळी ११ वाजता व सायंकाळी ५ वाजताची बससेवा मध्यंतरी सुरू करण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.