लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी शाळा वाचवा कृती समितीने राबविलेल्या अभियानांतर्गत यावेळी सोनेगाव येथील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत चिपको आंदोलन करण्यात आले. परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शाळेला चारही बाजूने कवटाळून, खासगी शाळा तुपाशी...सरकारी शाळा उपाशी..., आमची शाळा सुरू करा... सुरू करा... अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.सोनेगावची ही शाळा एकेकाळी सोनेगाव जुनी वस्ती, रहमतनगर, गजानन झोपडपट्टी, इंद्रप्रस्थनगर, ममता सोसायटी, शिवशक्ती ले-आऊट आदी परिसरातील चिमुकल्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा आधार होती. मात्र तीन वर्षांपूर्वी या शाळेला कायमचे कुलूप ठोकण्यात आले. त्यामुळे या भागातील गरीब पालकांना आपली मुले खासगी शाळेत टाकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. मात्र रोज-मजुरीत दोनवेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने करणाऱ्या या पालकांनी खासगी शाळेत मुलांच्या शिक्षणासाठी भरमसाट फी कुठून आणावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मनपाची ही शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. नागरिक बराच वेळ शाळेला चिपकून होते. माजी नगरसेविका अॅड. रेखा बाराहाते यांच्यासह किशोर वंजारी, संजय डोईजोड आदींच्या नेतृत्वात या भागातील कुणाल शंभरकर, प्रकाश भिते, आशिष सातपुते, नीतेश मंडपे, जावेद खान, राजेश कोपरे, चंद्रकांत भाकरे, सुरेश पोहनकर, पीयूष वाकोडीकर, डॉ. प्रणीत जांभुळे, विजय काम्बे, सिंधू इंगळे, संजय भाकरे, अजय मेश्राम आदी नागरिक चिपको आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी बॅनर, पोस्टर घेऊन आंदोलनात सहभाग घेतला.मनपाच्या शाळा मुद्दाम बंद करून प्रायव्हेट शाळांची दुकानदारी चालविली जाते. कोणत्याही परिस्थितीत ही शाळा सुरू करा, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करून स्वत:च शाळा सुरू करू, असा इशारा अॅड. बाराहाते यांनी दिला. चिपको आंदोलनानंतर चिमुकल्यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. परिसरातील वस्तीत घोषणा देत जनजागृती करण्यात आली. पत्रकेही वाटण्यात आली. सोनेगाव मनपा शाळा वाचवा कृती समिती आणि सहकारनगर मनपा शाळा माजी विद्यार्थी समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.मोहल्ला सभेत घेतले विविध ठरावरॅलीनंतर शाळेच्या मैदानातच मोहल्ला सभेचे आयोजन करण्यात आले. यात विविध ठराव घेण्यात आले. बंद पडलेली सोनेगाव शाळा तातडीने सुरू करा, मैदानाला सुरक्षा भिंत उभारा, शाळेची रंगरंगोटी करा, पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी-मराठीतून शाळा सुरू करा, उत्तम शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण द्या, आदी ठरावांचा यात समावेश होता. सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीचे धीरज भिसीकर, दीपककुमार साने, दीनानाथ वाघमारे, डॉ. वासुदेव डहाके, मुकुंद अडेवार तसेच बालरक्षक प्रसेनजित गायकवाडही उपस्थित होते.नगरसेवक, अधिकारी पोहचले नाहीकृती समितीतर्फे चिपको आंदोलन व नंतर मोहल्ला सभेचे आयोजन लक्षात घेता लक्ष्मीनगर झोनमधील सहायक आयुक्त, झोन सभापती आणि प्रभाग ३६ मधील चारही नगरसेवकांना मोहल्ला सभेचे पत्र देण्यात आले, मात्र ते उपस्थित झाले नाहीत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जर शाळेच्या प्रश्नांवर वेळ नसेल तर त्यांना मतदार पुढील निवडणुकीत आपली जागा दाखवतील, असा इशाराही सहभागी नागरिकांनी दिला.
आमची शाळा सुरू करा... सुरू करा : सोनेगावच्या मनपा शाळेत चिपको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:54 AM
सरकारी शाळा वाचवा कृती समितीने राबविलेल्या अभियानांतर्गत यावेळी सोनेगाव येथील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत चिपको आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देविद्यार्थी, नागरिकांनी शाळेला कवटाळले